गळाभेट राहू देऊ नका !

 

  गळाभेट राहू देऊ नका !


                                    गळाभेट राहू देऊ नका !

            माझा जन्म झाला तो काळ तसा जुना म्हणावा असा. वडिलांचे वैकुंठगमन झाले तोही खूप अलीकडचा काळ आहे असे नाही. त्यांना जाऊनही आता बारा वर्षे होऊन गेली आहेत.

वडील आणि मुलगा म्हणून आम्हाला पंचेचाळीस वर्ष एकत्र राहता आले. तथापि, तो काळ, त्यातील वडील आणि मुलाचे नाते, त्या नात्यातील मर्यादा, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती हे सगळे आजच्याहून खूप वेगळे होते.

वडिलांच्या समोर जास्त बोलायचे नाही, त्यांच्या ताटात हात घालायचा नाही, त्यांच्या शेजारी बसायचे नाही, तथाकथित लिबर्टी घ्यायची नाही, फार हट्ट करायचा नाही आणि त्यांच्या अंगाशी लगट तर करायचीच नाही. असा एकूण संस्कार होता.

असो, मी त्या संस्काराच्या मर्यादा पाळायचा प्रयत्न नेहमीच केला. अर्थात, अनेकदा चुकलो. अपराध देखील घडला. मात्र, त्याचा कुणी फार बाऊ केला नाही. माझी गाडी थोडी घसरायची, पुन्हा रुळावर यायची आणि दिवस, वर्ष पुढे सरकायची.

कधी आजूबाजूला मित्रत्वाच्या नात्याने वावरणारे मुलगा वडील दिसले की, अप्रूप वाटायचे. तुलना व्हायची आणि पुन्हा हे सगळे विसरून आपल्या संस्कारांना शिरोधार्य मानत जुन्याच वहिवाटीवरून प्रवास सुरु राहायचा.

कधी कधी वडिलांची तब्बेत बरी नसली की, हात, पाय, डोके, पाठ दाबून द्यावी लागायची. त्यांच्या शरीराला स्पर्श व्हायचा तो तितकाच. तोही कर्तव्य म्हणून आणि कंटाळा आलेल्या अवस्थेत. त्यांच्या जवळ खेटून बसावे, त्यांच्या अंगाखांद्यावर मिरवावे असे समज आल्यापासून कधी वाटलेच नाही. कदाचित, संस्काराने ती भावना येऊच दिली नाही.

आता या ठिकाणी हे आठवायचे कारण खूपच वेगळे आहे. अलिकडेच पडलेले आणि कधीही विसरता न येणारे एक स्वप्न हे या आठवणींचे कारण ठरले आहे. खरेतर स्वप्न ही मानसिक अवस्था आहे आणि त्यामुळे त्या स्वप्नांचा फार विचार करायचा नसतो इतपत मी शिकलो आहे. झोपेत स्वप्न पडली की काळासोबत सहज वीसरायची हे नित्याचेच आणि अंगवळणी पडलेले.

तरीही, वडील गेल्यानंतर अगदी परवा रत्नागिरीचा प्रवास संपवून पनवेल येथे रात्री पोहोचलो आणि वडील सकाळी, सकाळी स्वप्नात आले. काहीतरी प्रसंग होता. ते गर्दीत होते. मी दुरूनच त्यांना पाहिले आणि मी समोर असल्याची जाणीव करून दिली. त्यांनीही मला पाहिले. गर्दी दूर सारून जवळ आले आणि मी पाया पडताच त्यांनी मला छातीशी धरले. काही क्षणात स्वप्न संपून गेले.

हे सगळे स्वप्नात घडले होते. मी अर्धवट जागृत अवस्थेत होतो पण माझ्यावर अंमल झोपेचा होता. तरीही त्या स्वप्नात एक विलक्षण गोष्ट होती. वडील प्रत्यक्ष असताना कधी तो अनुभव आला नाही, पण स्वप्नात त्यांनी मला जे छातीशी धरले आणि आमची गळाभेट झाली त्यावेळी घेतलेल्या अनुभवाचे वर्णन असे शब्दात करणे अशक्य.

त्यांच्या छातीशी बिलागल्यावर प्रचंड उर्जा मिळाली. त्यांच्या गळ्यातील तुळशीमाळेचा सुखद स्पर्श जग विसरायला लावणारा होता. आपल्यात काहीतरी नव्याने मिसळतेय असेच वाटत होते. तो क्षण संपूच नये असे तो क्षण जगतानाच वाटत होते.

जाग आल्यावर आणि स्वप्न आठवल्यावर मन सैरभैर झाले हे वेगळे सांगायला नको. स्वप्न का पडले इथं पासून ते का संपले असे सगळे विचार एकामागून एक समोर येत राहिले. उत्तरे नसणाऱ्या प्रश्नांचे आपण जे करतो तेच मीही केले.

मात्र, ती गळाभेट आणि त्यातून मिळालेली ऊर्जा, शरीर रोमांचित करणाऱ्या जाणिवा विसरू शकलो नाही. कदाचित, जन्मभर विसरताही येणार नाहीत. आयुष्य भर पुरून उरेल असा तो दिव्य स्पर्श होता.

वाईट याचेच वाटले की, हा दिव्य स्पर्श प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी उणेपूरे पंचेचाळीस वर्ष असतानाही ती संधी कधी लक्षातच आली नाही. जगणे सार्थकी लावणारा तो स्पर्श जवळ असूनही अनुभवता आला नाही.

कदाचित, संस्कार, मर्यादा, रूढी, संकोच, स्वभाव अशा अनेक घटकांनी त्या स्पर्शाला प्रत्यक्ष अनुभवण्याची माझी संधी घालवली. मात्र हीच संधी अनेकांसाठी आजही सहज शक्य आहे आणि त्यांनी ती नि:संकोच घ्यावी म्हणूनच हा आतला अनुभव असा उजागर केला आहे.

मित्रहो, ज्यांना शक्य आहे त्यांनी संस्कार, मर्यादा, रूढी, संकोच, स्वभाव, परस्पर संबंधातील तणाव (असल्यास) असे काहीच मधे आणू नका. अगदी संधीं येताच वडिलांच्या समोर जा. पाहिजे तर परवानगी घ्या. विनंती करा, आर्जव करा पण त्यांच्या छातीला बिलगून ती ऊब, तो आश्वासक स्पर्श अनुभवा. जग विसरायला लावणारा आणि जगासमोर सिद्ध करण्याचे बळ देणारा तो स्पर्श नशिबानेच समोर आलाय असं समजा. नशीब नाराज व्हायच्या आत अट्टहासाने तो स्पर्श अनुभवा.

मी केवळ स्वप्नातील स्पर्शाने आणि गळाभेटीने भारावून गेलोय. आता हेही लक्षात आलेय की, या संधी पासून दूर ठेवणारे ते सगळे संस्कार संभाळूनही हा अनुभव घेता आला असता.

असो, माझ्यासाठी वेळ निघून गेलीय. आता प्रत्यक्षात तो स्पर्श आणि गळाभेट कशी असेल याचा नुसता विचार करणेच माझ्या हाती उरलेय हे ही खरे. मात्र, ज्यांना ते आजही शक्य आहे त्यांनी त्याला मुकू नये म्हणून हा समाज माध्यमाच्या मर्यादा सोडून केलेला शब्द प्रपंच. शक्य असणाऱ्यांसाठी दिव्य अनुभव देणाऱ्या गळाभेटीची संधी सांगणारा शब्द प्रपंच!

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.